एरंडोल प्रभाग क्र. 11 अ मधून सौ. सरोजबाई पाटील यांची उमेदवारी दाखल

प्रतिनिधी एरंडोल – येथे आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 अ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. सरोजबाई केवलसिंग पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मातोश्री असलेल्या सरोजबाई पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गत काही वर्षांत आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील तसेच तालुका, जिल्हा आणि राज्यातील असंख्य गरजू, गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेकांना नवसंजीवनी देण्याचे कार्य या फाउंडेशनतर्फे सातत्याने करण्यात आल्याने त्यांच्या समाजकार्यातील योगदानाची दखल घेत मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“होय… पहिले आम्ही समाजकार्य करून दाखविले” असे सांगत सौ. सरोजबाई पाटील यांनी आरोग्यसेवा, रुग्णसेवा यासोबतच प्रभागातील रस्ते, पाणी, रोजगार, सामाजिक सलोखा या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजकार्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“तुमच्या मतदानरूपी आशीर्वादानेच विकास शक्य आहे” असे आवाहन करत सौ. सरोजबाई पाटील यांनी प्रभागातील जनतेने विश्वास दाखविल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन दिले.




