जळगावधार्मिकमहाराष्ट्र

साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या पद्मालयातील हत्ती प्रतिमा भग्नावस्थेत; भाविकांचा संताप, मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह.


प्रतिनिधी एरंडोल:- पद्मालय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे गणपती तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. ‘अमोद’ व ‘प्रमोद’ या दोन स्वयंभू गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले हे क्षेत्र गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. एका गाभाऱ्यात उजव्या सोंडेचा अमोद व डाव्या सोंडेचा प्रमोद असे दोन स्वयंभू गणपती असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे.
मात्र या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मंदिराच्या शिखरावर असलेल्या हत्तींच्या प्रतिमा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र समोर येत आहे. काळाच्या ओघात तसेच योग्य देखभाल व संवर्धनाअभावी या हत्तींच्या प्रतिमा तुटलेल्या, झिजलेल्या व विद्रूप अवस्थेत दिसून येत आहेत. या प्रतिमा केवळ शोभेच्या वस्तू नसून मंदिराच्या स्थापत्यशैलीचा व धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत.
हत्तींच्या प्रतिमांची ही भग्नावस्था म्हणजे धार्मिक व ऐतिहासिक वारशाची थेट विटंबनाच असल्याची भावना भाविक व जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत. लाखो भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने पद्मालय येथे दर्शनासाठी येतात. मात्र अशी स्थिती पाहून भाविकांमध्ये नाराजी निर्माण होत असून मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मंदिर विश्वस्तांना हे दिसत नाही का, की ते मुद्दाम कानाडोळा करत आहेत?” असा खडा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही भाविकांकडून होत आहे.
दरम्यान, हत्तींच्या प्रतिमांची योग्य दुरुस्ती करून त्यांचे दीर्घकालीन संवर्धन कसे करता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. भारतातील नामांकित देवस्थानांपैकी एक असलेल्या पद्मालयच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवाचे जतन करणे ही मंदिर प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे भाविकांचे मत आहे.
वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात या मौल्यवान वारशाचे अपूरणीय नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तात्काळ जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button