जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे रासेयो श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी | एरंडोल : येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागातर्फे धारागीर येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दि. १३ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, धारागीरच्या सरपंच वैशाली पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, विजयसिंह पाटील, मुख्याध्यापक मिलिंद साळी आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. ७ ते १३ जानेवारी या कालावधीत झालेल्या या शिबिरात स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर प्रभावी उपक्रम राबविले. विशेष म्हणजे जलसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी स्वकष्टातून वनराई बंधारा उभारला असून या कार्याचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. तसेच गुरांचे लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमुळे धारागीर गावात सामाजिक जागृती निर्माण झाली.
समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वाढत्या डिजिटल व्यसनावर चिंता व्यक्त केली. मोबाईल हे आवश्यक साधन असले तरी त्याचा अतिवापर एकाग्रतेवर परिणाम करतो, मानसिक तणाव वाढवतो आणि सामाजिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करून अभ्यास व सामाजिक कार्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कारातून उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होतो, असे नमूद केले.
या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी माजी सैनिक बालसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. शिबिराचा सविस्तर अहवाल प्रा. विजय गाढे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले तर आभार प्रा. योगेश येडाईत यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button