एरंडोलला महिला मंडळांतर्फे मेळाव्यात रणरागिणी महिलांचा सत्कार-सन्मान संपन्न..

प्रतिनिधी एरंडोल – येथील जिजाऊ ब्रिगेड आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे शहरातील उल्लेखनिय कामगिरी करणार्या महिला मंडळांसह रणरागिणी (विधवा महिलांचा खडतर जीवनप्रवास) तसेच मॅरेथॉन स्पर्धेत सहभागासह बक्षिण मिळविणार्या महिलांचा सत्कार आणि हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस जिजाऊ वंदना आणि सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ प्रतिमा पुजन करण्यात आले.
एरंडोल येथील श्रीसाई-गजानन मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका इंदिराताई पाटील होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून एरंडोलचे प्रांताधिकारी मनिष गायकवाड यांच्या पत्नी योगाशिक्षिका डॉ. मीनल गायकवाड आणि एरंडोलचे आमदार अमोलदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी मृणालताई पाटील उपस्थित होत्या.
यावेळी एरंडोलच्या रजनी सुधाकर काळे यांनी सादर केलेले दाताचे दातवण घ्या गं कुणी…. गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच जळगांव येथील जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या प्रा. सरिता पाटील आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सहसंघटक प्रा. नीता पाटील यांनी सावित्री आईंचा वसा ही समाजप्रबोधन करणारी आणि समाजातील अंधश्रध्दा दूर करणारी नाटीका सादर करून उपस्थित महिलांचे लक्ष वेधले. तसेच मृणालताई पाटील यांनी अतिशय मोजक्या शब्दांत परिवर्तनवादी विचार मांडून आपली भूमिका स्पष्ट करून महिलांना मार्गदर्शन केले. योगाशिक्षिका डॉ. मीनल गायकवाड यांनी देखील महिलांनी आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योगाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी आपल्या मनोगतात हळदी-कुंकूचा मुख्य उद्देश सांगून समाजात होत असलेल्या अनिष्ट चालिरिती, रूढी, परंपरा आपण बंद केल्या पाहिजेत असे उपस्थित महिलांना आवाहन केले.
यावेळी पती निधनानंतर खडतर जीवनप्रवास करून परिवार सांभाळणार्या रणरागिणी शैला पाटील, रेखा चित्ते, सुरेखा पाटील, ज्योती शिंदे, सोनवणे ताई, लिंगायत ताई, वर्षा प्रविण पाटील, सुनंदा मराठे यांचा भेटवस्तू देवून मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रणरागिणी वर्षा प्रविण पाटील यांनी सांगितले की, मंडळाने मला दिलेला सन्मान अतिशय आत्मभान जागवणारा असून जिजाऊ मंडळाचे आभार मानले. तसेच समाजाने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा वृत्तांत समोर मांडला. यावेळी उपस्थित महिला भारावल्या. तसेच एरंडोलला संपन्न झालेल्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेवून डॉ. जुमाना बोहरी, उर्मिला पाटील, नगरसेविका छाया दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील महिला मंडळांच्या अध्यक्षा आणि नवनिर्वाचित नगरसेविका यांचा देखील सत्कार-सन्मान यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला अहिरराव, सुत्रसंचलन जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा मनिषा पाटील यांनी मार्मिक चारोळ्या आणि बहारदार अहिराणी कविता सादर करून महिलांना आनंदाने खिळवून ठेवण्यात यश मिळविले. आभार सुरेखा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनिषा पाटील, सुरेखा पाटील, शकुंतला पाटील, वंदना पाटील, इंदिरा पाटील, हिराबाई पाटील, रजनी काळे, वैशाली पाटील, जगताप मॅडम यांचेसह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी महिलांनी सुग्रास भोजनाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे उपस्थित महिलांमधून 5 महिलांचा लकी ड्रॉ चे बक्षिस देवून तसेच उपस्थित सुमारे 200 महिलांना देखील भेटवस्तू देवून संक्रांतीचे वाण वाटून आनंद द्विगुणित केला.




