जळगावमहाराष्ट्र

*चाळीसगावी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करण्यास एरंडोल तालुक्यातून तीव्र विरोध……….!*

प्रतिनिधी एरंडोल – चाळीसगांव येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव कार्यान्वित करण्याच्या हालचाली महसूल यंत्रणेतर्फे सुरू झाल्या आहेत.त्यात एरंडोल तालुक्याचा समावेश करण्याबाबत शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.वास्तविक एरंडोलपासून जिल्हाधिकारी कार्यालय असलेले जळगांव अवघ्या ३० कि.मी.अंतरावर आहे.याउलट एरंडोल ते चाळीसगांव हे ७२ कि.मी.अंतर आहे.एरंडोलपासून चाळीसगांव हे जळगावच्या तुलनेत अडीच पट लांब अंतरावर आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांसाठी एरंडोल तालुक्यातील नागरिकांना एवढ्या लांब अंतरावर जाण्याची शिक्षा कशासाठी? असा संतप्त सवाल केला जात आहे.तसेच एरंडोल तालुका चाळीसगांवच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयास जोडल्यास नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होणार आहे.विशेष म्हणजे एरंडोल ते चाळीसगांव जाण्यासाठी अडीच तास व परत येण्यासाठी अडीच तास लागतो.यासाठी तालुक्यातून चाळीसगांवला एरंडोल तालुका जोडण्यास तीव्र विरोध होत असून या विरोधाचे रूपांतर तीव्र आंदोलनात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
       एरंडोल तालुका हा ब्रिटिशकालीन तालुका असून त्यात एकूण ६५ गावे आहेत.तालुक्याच्या पुर्व भागातील जवळपास २५ गावे गिरणा नदीकाठ परिसरातील असून गिरणा नदी ओलांडली तर जळगांव हे अवघ्या १० कि.मी.अंतरावर आहे.एरंडोल हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेले असून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जलदगतीने नागरिकांना जळगाव गाठता येते.एकंदरीत एरंडोल तालुक्यातील जनतेसाठी जळगांवचे जिल्हाधिकारी कार्यालय हे अत्यंत सोयीचे असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांबरोबर इतर शासकीय कार्यालयातील व न्यायालयातील कामे सहजगत्या पार पाडले जाऊ शकतात.मग अशा सर्व दृष्टीने जळगांव येथे अनुकूलता असतांना चाळीसगांवला एरंडोल जोडण्याचा खटाटोप कशासाठी? या विषयावर तालुक्यातील जनतेमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
      असे असतांना ‘ जळगांव सोडा आणि चाळीसगांव जोडा ‘ अशी भुमिका शासनाने घेऊ नये.अशी जोरदार मागणी होत आहे.’ काखेत कळसा अन् गावाला वळसा ‘ असा हा प्रकार एरंडोलची जनता कदापि सहन करणार नाही.सर्व बाबींचा विचार करता सर्व दृष्टीने चाळीसगांव हे एरंडोलच्या जनतेला अत्यंत गैरसोयीचे, त्रासदायक व अन्यायकारक होणार आहे.म्हणूनच सोडा जळगांव अन् चला चाळीसगाव या भुमिकेला एरंडोलच्या नागरिकांकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे.
      वास्तविक एरंडोल येथील ‘ एरंडोली ‘ ही महाराष्ट्रात सर्वत्र सुपरिचित असतांना येथील जनतेवर अन्याय कशासाठी व्हावा.असा सुर सर्व स्तरातून उमटत आहे.शेवटी नको आम्हाला चाळीसगांव आम्हाला आहे ते द्या जळगांव.अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button