जळगावमहाराष्ट्रशैक्षणिकसांस्कृतिक

प्रोग्रेसिव्ह’इंग्लिश स्कूल मध्ये ‘राजवंश’ सोहळा साजरा.

प्रतिनिधी – एरंडोल येथील श्रमिक सर्वांगीण विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ‘राजवंशः अध्यात्म आणि शौर्याचा गौरवशाली प्रवास’ या संकल्पनेतून मंगळवारी (दि. २७ जानेवारी) शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मृणाल अमोल पाटील, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी जे. डी. पाटील, आलम शेख व नितीन शर्मा उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद काबरा, उपाध्यक्षा पियुषा काबरा तसेच प्राचार्या स्मिता घोरमोडे उपस्थित होत्या.
    “इतिहासाची पुनरावृत्ती पाहिली” – मृणाल पाटील
प्रमुख पाहुण्या मृणाल पाटील यांनी भाषणात शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करताना, प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये खऱ्या अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती अनुभवायला मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख करून देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
    प्रास्ताविक व वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्या स्मिता घोरमोडे यांनी केले. वर्षभरात विविध स्पर्धा व परीक्षांत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
  यावेळी अवघ्या १६ व्या वर्षी नाविन्यपूर्ण केळी चिप्स उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या दुर्गेश शिंपी या विद्यार्थ्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
   यंदाची ‘राजवंश’ ही संकल्पना उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. नर्सरी, ज्युनियर व सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे श्रीकृष्ण, महादेव व हनुमान यांच्या रूपांत सादरीकरण करून भक्तीमय वातावरण निर्माण केले. तर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप, बाजीराव पेशवा, झाशीची राणी लक्ष्मीबाई व तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथा प्रभावीपणे सादर केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय अधीक्षक प्रशांत ढोले, भावना लब्बा, नृत्य कलाशिक्षक राहुल वडनेरे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित पालक वर्गाने विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी आभारप्रदर्शन व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button