पद्मालय जंगलातील खुनाचा पर्दाफाश; आरोपी जेरबंद..

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील पद्मालय–नागदुली रस्त्यालगतच्या जंगलात आढळलेल्या अज्ञात महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेह प्रकरणी जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पद्मालय वनपरिक्षेत्रात निर्जन स्थळी एका महिलेचा विद्रूप अवस्थेतील अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थाने जाळण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घनदाट जंगल व मानवी वर्दळ नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुर्नी’ हे ओळखीचे महत्त्वाचे धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या (मॅगॉट्स) वाढीवरून मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारी रोजी झाल्याचे निश्चित केले.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व घटनास्थळावरील भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
प्राथमिक तपासात मृत महिलेचे नाव आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, खैरागड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असल्याचे निष्पन्न झाले. प्रेमसंबंधातून झालेल्या वैयक्तिक वादातून आरोपीने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर प्रहार करून व ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, विनोद सुभाष पाटील तसेच जळगाव पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी बजावली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




