जळगाव जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक; आमिषांना बळी पडू नका – पोलीस अधीक्षकांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी – जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस मुख्यालय, जळगाव येथे शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
पहिल्या दिवशी एकूण ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ३४० उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिले. शारीरिक मोजमापात ४१ उमेदवार अपात्र ठरले, तर मैदानी चाचणीत १७९ उमेदवार अपात्र झाले. विहित निकषांनुसार अखेरीस १२० उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरल्याची माहिती प्रशासनाने दिली.
संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्ता (मेरिट) आधारित असून, मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मैदान परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्व चाचण्या पार पडत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उमेदवार व पालकांना सतर्कतेचा इशारा देत आवाहन केले आहे की, काही समाजकंटक किंवा दलालांकडून “पोलीस भरतीत निवड करून देतो” असे खोटे आश्वासन देऊन पैशांची मागणी केली जाऊ शकते. उमेदवारांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. पोलीस भरतीसाठी पैसे देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही व्यक्तीने भरतीच्या बहाण्याने पैशांची मागणी केल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ही भरती प्रक्रिया केवळ कष्ट, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या जोरावरच पार पडणार असल्याने उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.




