एरंडोल–म्हसावद रस्त्यावर अपघातांचा धोका वाढला….सब स्टेशनजवळ चारचाकीची सायकलस्वार विद्यार्थ्याला धडक; गतिरोधक व वेगमर्यादेची तातडीची मागणी.

एरंडोल :- एरंडोल–म्हसावद रस्त्यावर शाळा ग्रामीण रुग्णालयाच्या सब स्टेशन परिसरात वाहतुकीची प्रचंड वर्दळ असून येथे अपघातांचा धोका वाढताना दिसत आहे. याच ठिकाणी घडलेल्या घटनेत सायकलवरून जात असलेल्या सहावीतील विद्यार्थ्याला चारचाकी वाहनाने धडक दिली.
अपघातग्रस्त विद्यार्थी साहिल प्रकाश बेलदार, हा जिजामाता माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी असून, तो गुरांसाठी चारा आणण्यासाठी सायकलने जात असताना सब स्टेशनजवळ चारचाकी वाहनाने (क्रमांक जि.जे ०५ सी पी३२०३ ) धडक दिली. या अपघातात त्याच्या पाठीला तसेच हात-पायाला दुखापत झाली. तातडीने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
परिसर संवेदनशील, पण सुरक्षिततेची साधने अपुरी
या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय, शाळा-महाविद्यालये आणि गव्हर्मेंट आयटीआय असल्यामुळे लहान मुले, महिला व रुग्णांचा सातत्याने वावर असतो. मात्र अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. सब स्टेशन परिसरात स्पष्ट सूचना फलक, वेगमर्यादा दर्शक चिन्हे आणि पादचारी मार्गांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
स्थानिक नागरिकांचे मुद्दे व मागण्या सब स्टेशन व शाळा-रुग्णालय परिसरात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तातडीने बसवावेत.
वेगमर्यादा ३० किमी/ता. स्पष्टपणे दर्शवणारे फलक व रिफ्लेक्टिव्ह मार्किंग करावे.
पादचारी झेब्रा क्रॉसिंग व सायकलस्वारांसाठी सुरक्षित लेन उपलब्ध करावी.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या मागण्या लावून धरल्या असून, “आज एक विद्यार्थी जखमी झाला; उद्या मोठी दुर्घटना टाळायची असेल तर तातडीची पावले उचलली पाहिजेत,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.



