रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप; १७३ विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव : शहर वाहतूक शाखा जळगाव यांच्या वतीने वाहतूक सप्ताहानिमित्त महिनाभर राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा मंगळवारी (दि. १७) समारोप करण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहरात वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
अभियानांतर्गत जळगाव शहरातील ३५ शाळांमध्ये रस्ता सुरक्षा विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ईव्हीएस बस येथे कार्यशाळा, विविध कंपन्यांमध्ये मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली. प्रमुख चौक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, महाविद्यालये व शाळांबाहेर वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. रिक्षा व दर्शनी भागांवर वाहतूक नियमांचे बॅनर लावून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत हेल्मेट रॅली काढण्यात आली. तसेच आर.एस.पी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून सहभाग नोंदविला.
या अभियानाचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या महापौर दिपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी उपस्थित होते. तसेच जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे व पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण अव्हाड यांची उपस्थिती होती.
स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या एकूण १७३ विद्यार्थ्यांना व ३० शिक्षकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात श्रीराम माध्यमिक स्कूल, शिक्षण मंदिर संस्थेची अभिनव पाठशाळा तसेच एम.जे. कॉलेज एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. विविध संस्था व उद्योजकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अभियानामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.




