जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचा उपक्रम; परिसरातील ज्येष्ठांना लाभ

प्रतिनिधी, एरंडोल : येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच पी. एम. उषा सॉफ्ट कॉम्पोनन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  सूर्योदय ज्येष्ठ नागरिक भवन येथे हे शिबिर पार पडले. शिबिरात परिसरातील जवळपास १०० ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील होते. शिबिराचे उद्घाटन धरणगाव महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. कांचन महाजन यांच्या हस्ते झाले. एरंडोलमधील नामांकित डॉक्टरांच्या पथकाने ज्येष्ठांची तपासणी केली. यामध्ये डॉ. सुयश सुभाष पाटील (जनरल फिजिशियन), डॉ. अर्चना महाले (स्त्रीरोग तज्ज्ञ), संजय कुमार साळुंखे (नेत्र चिकित्सक) व प्रमोद पाटील (कृष्णा क्लिनिक लॅबोरेटरी) यांचा समावेश होता. शिबिरात शारीरिक तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्त तपासण्या करण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात अमित पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत वाढत्या वयात नियमित तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. “आजचा भारत तरुणांचा असला तरी प्रत्येकाला वृद्धत्वाकडे वाटचाल करावी लागते. त्यामुळे ज्येष्ठांनी आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. कांचन महाजन यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करत, एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्न भारत घडेल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मीना काळे यांनी तर आभार प्रा. डॉ. शर्मिला गाडगे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, डॉ. स्वाती शेलार, समन्वयक प्रा. आत्माराम चिमकर, प्रा. सागर विसपुते तसेच एनसीसी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी, सचिव विनायक कुलकर्णी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button