जळगावमहाराष्ट्रसांस्कृतिक

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धांचा भव्य जल्लोष”

“शिवस्वराज्याच्या प्रेरणेचा दीप प्रज्वलित

एरंडोल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विविध सांस्कृतिक व राज्यस्तरीय स्पर्धांचे उत्साहपूर्ण व दिमाखदार आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालय परिसर भगव्या पताकांनी, आकर्षक रांगोळ्यांनी आणि शिवकालीन देखाव्यांनी सजविण्यात आला होता. पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल  पाटील तसेच एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व उप नगराध्यक्ष सौ सुनीता माळी उपस्थित होते. याशिवाय नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक, शहरातील मान्यवर नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिववंदनेने वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना आमदार अमोल दादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठा आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी शिक्षणासोबत सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करत सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची गरज व्यक्त केली.

या निमित्ताने महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा, शिवगर्जना, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवचरित्रातील प्रसंगांचे प्रभावी व हृदयस्पर्शी सादरीकरण केले.

स्पर्धांतील विजेत्यांना आमदार अमोल पाटील व नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे, ट्रॉफी व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. पूजा चव्हाण, भाऊसाहेब पवार, जयदीप बोरसे, मयुरी सपकाळे, प्रिया लोहार, प्रज्ञेश झांबरे व दिक्षा बेहेरे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी व्यक्त केले. शिवजयंतीच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button