जळगावमहाराष्ट्रशेती विषयक

एरंडोल येथे ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ उपक्रमांतर्गत पीक विमा पॉलिसीचे वितरण..

प्रतिनिधी एरंडोल : भारतीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजना तसेच पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना या योजना तालुक्यात प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहेत. रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत बँकेमार्फत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा पॉलिसी प्रत्यक्ष हातात देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, एरंडोल येथे ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फरकांडे येथील शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसीचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हातात थेट विमा पॉलिसी सुपूर्द केल्याने त्यांना विमा संरक्षणाबाबत स्पष्ट माहिती मिळून पारदर्शकतेचा व विश्वासाचा आधार निर्माण होत आहे.

कार्यक्रमास तहसीलदार गोपाळ पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव गंभीरे, भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक अमित पवार, तालुका प्रतिनिधी मनोहर पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे महत्त्व पटवून दिले. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा गारपिटीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण कसे उपयुक्त ठरते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नुकसानभरपाईसाठी दावा नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि वेळमर्यादा याविषयीही माहिती देण्यात आली.

‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा विमा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होऊन योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावीपणे मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button