एरंडोल नगर परिषदचा १४६.५१ कोटींचा करवाढमुक्त अर्थसंकल्प मंजूर

प्रतिनिधी एरंडोल : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एरंडोल नगर परिषदचा १४६ कोटी ५१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कोणतीही करवाढ न करता ७८ लाख ४८ हजार रुपयांची शिल्लक राखण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अर्थसंकल्पीय सभेला नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष सौ. सुनिता रुपेश माळी तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजना, नदी संवर्धन, विविध शासकीय योजना व झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महिला बचतगट सक्षमीकरण, ‘बहिणामार्ट’ सुरू करणे, महिला व बालकल्याण कार्यक्रम तसेच दिव्यांगांसाठी प्रशिक्षण व कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पालिकेचे उत्पन्न वाढविणे आणि अनावश्यक खर्च टाळणे यावर भर देत हा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.




