चाळीसगाव येथे नियोजित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला एरंडोल करांचा विरोध.

प्रतिनिधी – एरंडोल येथील स्थानिक नागरिकांनी चाळीसगाव येथे होऊ घातलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध दर्शविला असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चाळीसगाव येथे नियोजित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ घातले असून त्याबाबतचा शासन निर्णयाच्या हालचालींना वेग आला असून या कार्यालयाला एरंडोल तालुका ही जोडण्यात आलेला असून त्यास एरंडोल येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील नागरिकांचा सदर निर्णयाला प्रचंड विरोध असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना देण्यात आले. सदर निवेदन एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनाही देण्यात आले.
निवेदनावर माजी नगरसेवक विजय महाजन, एरंडोल शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी रवींद्र पाटील, प्रसाद दंडवते व एरंडोल शहर संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण महाजन,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,ॲड.दिनकर पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर यांच्या सह्या आहेत.



