शहरातील सर्व प्रवेशद्वार पथदिव्यांनी लखलखणार.नागरिकांमध्ये समाधान.

प्रतिनिधी एरंडोल-शहरातील सर्व प्रवेशद्वार परिसरात आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजने अंतर्गत सुमारे पाचशे पथदिवे बसवण्याचे काम वेगाने सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर बसवण्यात येणा-या पथदिव्यांमुळे परिसर उजेडाने लखाखणार असून सौंदर्यात भर पडणार आहे.पथदिवे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे नागरिकांना अंधारापासून मुक्तता मिळणार आहे.शहरातील धरणगाव रस्ता,कासोदा दरवाजा,विखरण रस्ता,म्हसावद रस्ता,बी.एस.एन.एल कार्यालय,जुना धरणगाव रस्ता परिसर यासारख्या गावात प्रवेश करणा-या प्रवेशद्वार परिसरात पथदिव्यांची सोय पुरेशा प्रमाणावर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.शहराचा
विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून नवीन वसाहती निर्माण होत असल्यामुळे या परिसरात रस्त्यांवर पथदिवे बसवण्यात यावेत अशी मागणी रहिवाशांनी केली होती.शहरातील अनेक नवीन वसाहतींमध्ये रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे
चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सर्व प्रवेशद्वार परिसरात रात्री सर्वत्र अंधार असल्यामुळे महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.आमदार अमोल पाटील यांनी ज्वलंत समस्येची दाखल घेवून पथदिव्यांसाठी निधी उपलब्ध
व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.शासनाच्या नागरी सेवा योजनेअंतर्गत शहरातील पथदिव्यांसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून शहरातील सर्व प्रमुख प्रवेशद्वार परिसरात पाचशे
पथदिवे बसवण्यात येणार आहेत.सद्यस्थितीत सर्व प्रवेशद्वारांवर सुमारे चारशे पथदिवे बसवण्यात आले असून अनेक पथदिवे सुरु करण्यात आल्यामुळे परिसर लख्ख प्रकाशाने लखाखला आहे.शंभर पथदिवे बसवण्याचे काम सुरु असून धरणगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे या परिसरात पथदिवे बसवण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.यो योजनेअंतर्गत धरणगाव रस्त्यावरील तनिष्क पेट्रोल पंपापासून म्हसावद रस्त्यावरील ग्रामीण रूग्णालयापर्यंत पथदिवे बसवण्यात येणार आहे. तसेच कासोदा नाक्यापासून जुन्या धरणगाव रस्त्यावरील दहाखूटीपर्यंत,केवडीपुरा परिसरात पथदिवे लावण्यात येणार
असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. मरीमाता चौकातील अंजनी नदीच्या पुलावर देखील पथदिवे बसवण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.आगामी काळात शहराबाहेर निर्माण झालेल्या नवीन वसाहतींमध्ये देखील पथदिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या रस्त्यांचे पथदिव्यांच्या माध्यमातून भाग्य
उजाळणार असल्यामुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




