पारोळा कुटीर रुग्णालयातील एसी बंद करण्याची मागणी; वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन.

प्रतिनिधी पारोळा : – येथील कुटीर रुग्णालयातील प्रशासकीय दालनात सुरू असलेली एअर कंडिशनिंग (एसी) यंत्रणा तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून याबाबत कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील कुटीर रुग्णालयात काही प्रशासकीय कक्षांमध्ये एसीचा वापर केला जात आहे. मात्र रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना अनेकदा मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्रशासकीय दालनांमध्ये एसीचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीज खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेला सर्वप्रथम प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी आवश्यक औषधे, सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक भर देणे गरजेचे असताना प्रशासकीय दालनातील एसीमुळे विजेचा अनावश्यक वापर होत असून तो जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप निवेदकांनी केला आहे.
त्यामुळे प्रशासकीय कक्षातील एसी यंत्रणा तातडीने बंद करून विजेची बचत करावी आणि रुग्णालयातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता जाकीर पिंजारी व सामाजिक कार्यकर्ता शाकीर जाकीर पिंजारी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर करून ही मागणी केली.



