गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड!

प्रतिनिधी एरंडोल- येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर धडक मारली आहे. या यशामुळे संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भडगाव तालुक्यातील पेडगाव येथे दिनांक ११ रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १५ वर्षांखालील कुमार गटात प्रांजल पाटील हिने ६६ किलो वजन गटात फ्री स्टाईल प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर निवड निश्चित केली. त्याचप्रमाणे भावेश आरखे याने ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर निवड मिळवली.
१७ वर्षांखालील महिला गटात यामिनी आरखे हिने ५३ किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड मिळवली. २० वर्षांखालील ग्रीको रोमन गटात भूषण आरखे याने ६७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर निवड निश्चित केली.
वरिष्ठ महिला महाराष्ट्र केसरी गटात प्रेरणा मराठे हिने ६५ किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये, तर योगेश्वरी मराठे हिने ६२ किलो वजन गटात फ्री स्टाईलमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर निवड मिळवली.
या सर्व खेळाडूंना गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व प्रशिक्षक भानुदास आरखे, वस्ताद अनिल मराठे तसेच दिलीप पहिलवान सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल आमदार अमोल पाटील, अॅड. किशोर काळकर, बालाजी उद्योग समूहाचे संचालक संजय काबरा, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, एमडीबी केमिकल्सचे पंकज काबरा तसेच एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.




