स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी मुंबई :राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे आज मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद दुपारी ४.०० वाजता सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई येथे होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा कार्यक्रम, आचारसंहितेची अंमलबजावणी, उमेदवारी प्रक्रिया, मतदार याद्या आणि निवडणूक पारदर्शकतेसंबंधी महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्यातील विविध नगर परिषद, नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असल्याने या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आयोगाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी केली असून, मतदार नोंदणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची तपासणी आणि कर्मचारी प्रशिक्षण या बाबींची माहितीही पत्रकार परिषदेत दिली जाण्याची शक्यता आहे.
सदर पत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमाविषयी अधिकृत माहिती प्रथमच माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.




