पुरुषोत्तम मासानिमित्त एरंडोलमध्ये भक्तिमय वातावरण; गांधीपुरा येथे शिव महापुराण कथेचे आयोजन

एरंडोल : पुरुषोत्तम मासानिमित्त शहरातील गांधीपुरा परिसरात भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. समस्त गांधीपुरा नागरिक व महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सात दिवसीय धार्मिक सोहळ्यास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रसिद्ध कथाकार दिलीप महाराज वृंदावनकर यांच्या मधुर व ओजस्वी वाणीतून शिव महापुराण कथेचे निरूपण होत असून भगवान शंकराच्या विविध लीलांचे रसाळ वर्णन भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा देत आहे. कथेदरम्यान सजीव रास, संगीतमय भजन, हरिनाम संकीर्तन यांसारख्या कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक भक्तिरसाने भारावून गेले आहे.
पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असल्याने महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत आहे. सकाळपासूनच कथा स्थळी दर्शन, पूजा-अर्चा व धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी होत असून परिसरात भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.
या धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात अध्यात्म, संस्कार, एकोपा आणि सद्भावना रुजविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. युवक व महिलांचाही आयोजनात सक्रिय सहभाग असून संपूर्ण परिसर स्वयंप्रेरणेने सेवा कार्यात सहभागी होत आहे.
सात दिवसीय शिव महापुराण कथेचा समारोप काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार असून या सोहळ्यास अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर ट्रस्ट व गांधीपुरा परिसरातील नागरिकांनी केले आहे.




