खड्ड्यांनी वाहतूक कोंडी; म्हसावद नाक्यावरील पुलाची तातडीने दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी एरंडोल :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनी धरणातील आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अंजनी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पुराच्या जोरदार प्रवाहाचा फटका म्हसावद पुलाला बसला. पुराच्या पाण्यामुळे पुलाचा काही भाग वाहून गेल्याने पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, घटनेला तब्बल २१ दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
म्हसावद नाक्यानजीकचा हा पूल एरंडोल शहराच्या पूर्वेकडील पुरेभाग, नवीन वसाहती, डी.डी.एस.पी. महाविद्यालय, महाबीज केंद्र, वीज वितरण कार्यालय, तहसील व प्रांत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वनविभाग कार्यालय तसेच शासकीय आय टी आय महाविद्यालया सह शहराच्या विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर दररोज विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण, कामगार, शेतकरी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.
पुलावरील खड्ड्यांनी वाढवली वाहतूक कोंडी
पुरामुळे पुलाची झालेली दुरवस्था आणि पुलावरील मोठमोठे खड्डे यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. पुलाचा मार्ग अरुंद झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहतूक विस्कळीत होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खड्ड्यांमधून वाहने काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
गुजरात कडून शिरपूर, चोपडा व धरणगावकडून येणारी जड वाहने तसेच अन्य वाहने याच मार्गाने नेरी, जामनेर व संभाजीनगरच्या दिशेने ये-जा करतात. त्यामुळे या पुलाचे महत्त्व लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे.
ब्रिटिशकालीन पुलाची स्थिती चांगली; नवीन कामांवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे परिसरातील ब्रिटिशकालीन जुना पूल आजही तुलनेने मजबूत व सुस्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या नवीन काँक्रीट व डांबरीकरणाच्या कामांवर दरवर्षी पावसाळ्यात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पावसाळ्यात याच ठिकाणी वारंवार खड्डे पडतात आणि डांबर तसेच सिमेंटचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने प्रशासनाने आणखी विलंब न करता पुलाची दुरुस्ती हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.





