एरंडोल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

एरंडोल – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकीपटू व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रीडा क्षेत्राचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये असलेले अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. ए. बडगुजर, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. जे. वाघ, कुलसचिव श्री. एस. एस. बोरसे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, मैदानी खेळ व विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, चिकाटी आणि संघर्षशील वृत्ती विकसित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय क्रीडा दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.





