आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या मदतीने चंद्रकांत अभंग यांना जीवनदान!

हृदयातील तीन ब्लॉकेजवर यशस्वी अँजिओप्लास्टी; आर्थिक अडचणीतील कुटुंबाला जितेंद्र पाटील यांचा आधार

प्रतिनिधी : आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना हृदयातील तीन ब्लॉकेजमुळे गंभीर संकटात सापडलेल्या हडपसर येथील ३९ वर्षीय चंद्रकांत दत्तात्रय अभंग यांना आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून त्यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. विशेष म्हणजे, या उपचारांसाठी कुटुंबाला स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करावा लागला नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

चंद्रकांत अभंग यांना काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने त्यांनी रुग्णालयात तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यानंतर भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या उपचारांसाठी सुमारे चार ते साडेचार लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे एवढा मोठा खर्च करणे कुटुंबाला शक्य नव्हते.

या संकटाच्या काळात अभंग यांच्या बहिणीने परिचितांशी संपर्क साधला. हेमंत पाटील यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी तातडीने वैद्यकीय अहवाल मागवून घेतले आणि पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले.

त्यानंतर ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करण्यात आली. जितेंद्र पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपलब्ध वैद्यकीय पर्यायांची माहिती घेतली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर चंद्रकांत अभंग यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या रुग्णाला वेळेवर मदत मिळाल्याने अभंग कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करून जितेंद्र पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. या मदतीबद्दल अभंग कुटुंबीयांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये आणि त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी, हे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. या कार्यातून गरजू रुग्णांना आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button