जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसाई वाड्यात नगरपरिषदेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम

साडेसहा तासांच्या कारवाईत १६ ट्रॅक्टर अतिक्रमित साहित्य हटविले; मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

एरंडोल : शहरातील सार्वजनिक जागा आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या उद्देशाने एरंडोल नगरपरिषदेमार्फत कसाई वाडा परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तब्बल साडेसहा तास चाललेल्या या मोहिमेत १६ ट्रॅक्टरमधून अतिक्रमित साहित्य, बांधकामाचे मटेरियल आणि इतर टाकाऊ साहित्य हटविण्यात आले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कसाई वाडा परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर यावेळी कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे रस्त्यावरील अडथळे दूर करण्यास मदत झाली असून, सार्वजनिक जागांचा वापर सुरळीत होण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने पाऊल उचलले आहे.

या मोहिमेत कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर, कर निरीक्षक जनार्दन येवले, रचना सहाय्यक सुमित उमराणे, आरोग्य निरीक्षक जीवन जाधव यांच्यासह आर. टी. महाजन, दीपक गोसावी, तुषार शिंपी, कैलास देशमुख, वैभव पाटील आणि आशिष परदेशी या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पोलीस बंदोबस्तात कारवाई

अतिक्रमण निर्मूलन मोहीम शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरातील नागरिकांनी शासकीय जागांवर तसेच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करू नये. सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button