SIR मोहिमेत एरंडोलची जिल्ह्यात अव्वल कामगिरी!

प्रतिनिधी एरंडोल :- SIR मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे एरंडोल तालुक्याने जळगाव जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मोहिमेत जिल्ह्यात अव्वल कामगिरी केल्याबद्दल एरंडोलचे नायब तहसीलदार अमोल बन यांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात सहकार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार SIR मोहिमेचे काम करण्यात आले. कामाचे योग्य नियोजन, अचूक माहिती संकलन, नोंदींची पडताळणी, वेळेत उद्दिष्टपूर्ती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या माध्यमातून अमोल बन यांनी कामात समन्वय राखला. त्यांच्या या कामगिरीची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.
या मोहिमेत BLO, सहा महसूल अधिकारी, शेख, ठाकूर, महसूल सहाय्यक विजय कोळी, विशाल सोनवणे आणि मीना मॅडम यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महसूल सहाय्यक विजय कोळी यांनीही कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शासकीय मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील समन्वय, जबाबदारीची जाणीव आणि वेळेचे नियोजन किती महत्त्वाचे असते, हे एरंडोलच्या या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालेला हा सन्मान एरंडोलच्या महसूल प्रशासनासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी कामकाजासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.





