अखेर म्हसावद नाक्यावरील पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त!

हॅलो एरंडोल न्यूज ची बातमीची दखल; अंजनी नदीवरील पुलाचे काँक्रिटीकरण सुरू, नागरिकांकडून समाधान व्यक्त
एरंडोल (प्रतिनिधी) : शहरातील मरी माता मंदिरासमोरील म्हसावद नाक्याजवळील अंजनी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, सध्या पुलावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात ‘ हॅलो एरंडोल न्यूज ‘ ने सातत्याने नागरिकांची समस्या मांडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत दुरुस्तीचे काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अंजनी नदीपात्रातून वाहून गेलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहामुळे या पुलाच्या पृष्ठभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग अरुंद झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत धरून या मार्गावरून ये-जा करावी लागत होती. विशेषतः समोरून वाहने आल्यास अपघाताचा धोका अधिकच वाढत होता.
या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दोन ते अडीच महिने उलटूनही ठोस दुरुस्ती होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. यासंदर्भात ‘ हॅलो एरंडोल न्यूज ’ने वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघाताचा धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
अखेर या वृत्ताची दखल घेत संबंधित प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पुलावर काँक्रिटीकरण केले जात असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, पुलाचे दुरुस्तीचे काम दर्जेदार व कायमस्वरूपी करण्यात यावे तसेच काम लवकर पूर्ण करून हा मार्ग सुरक्षित वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या वृत्तपत्रीय बातमीची प्रशासनाकडून दखल घेतली गेल्याने प्रसार माध्यमांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.




