जळगावमहाराष्ट्र

एरंडोलमध्ये अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; चार वाहने आणि ७६ ब्रास वाळू जप्त!

महसूल व पोलिस प्रशासनाची संयुक्त मोहीम; ३१ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू वाहतुकीविरुद्ध महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली. या मोहिमेत चार वाहनांसह एकूण ७६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख ५८ हजार १०७ रुपये असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

उत्राण गावातील मारोती मंदिराजवळ २५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता टाटा कंपनीचे मॉडेल १५१२ सहा चाकी आयशर वाहन (क्रमांक एमएच-१८ बीजी-७२०८) वाळू वाहतूक करताना आढळून आले. या वाहनातून अंदाजे पाच ब्रास वाळूची वाहतूक होत होती. पथकाला पाहून चालक वाहन जागेवर सोडून पळून गेल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. या कारवाईत वाळू व वाहनासह एकूण ६ लाख २३ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गिरणा नदीपात्र परिसरात २५ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २६ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत तीन वेगवेगळ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक वाजता निळ्या रंगाचा टाटा डंपर (क्रमांक एमएच-१८ सीबी-१९२०) आठ ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळला. वाहनातील वाळूची किंमत ३७ हजार ६५६ रुपये, तर डंपरची किंमत आठ लाख रुपये, असा एकूण ८ लाख ३७ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनमालक नीलेश राजेंद्र भदाणे आणि चालक रामू महादेव शिवाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत २५ ऑक्टोबर रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन (क्रमांक एमएच-२० जीसी-९१४७) दोन ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळले. या वाहनातून ६ लाख ९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी शाहरुख शब्बीर पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईत २५ ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा निळसर रंगाचा डंपर (क्रमांक एमएच-४८ एजी-१५९३) एक ब्रास वाळूची वाहतूक करताना आढळून आला. या कारवाईत वाळू व डंपरसह ८ लाख ४ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भूषण शिवाजी सोनवणे, रा. विंचूर, ता. जि. धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनांवरील कारवाईबरोबरच साठ ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. या वाळूची अंदाजित किंमत दोन लाख ८२ हजार ७२० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जप्त केलेली वाळू पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आली आहे.

या मोहिमेत तहसीलदार गोपाळ पाटील, उत्राणचे ग्राम महसूल अधिकारी रविराज साहेबराव पाटील, उत्राणचे नरेंद्र पाटील आणि मंडळ अधिकारी नदीम शेख यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. पोलिस प्रशासनातर्फे कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत पाटील, नितीन सूर्यवंशी, धर्मेंद्र ठाकूर, श्रीकांत ब्राह्मणे, नीलेश गायकवाड आणि योगेश पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संबंधित प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा बडगा उगारला असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button