सेवा संकल्प अभियानांतर्गत माहिती अधिकार दिनानिमित्त एरंडोल नगरपालिकेत विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

एरंडोल : महाराष्ट्र शासनाच्या निदेर्शानुसार माहिती अधिकार दिनानिमित्त एरंडोल नगरपालिकेच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत जनजागृती निर्माण करणे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे तसेच कायद्याच्या विविध तरतुदींबाबत सखोल माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्मवीर अभ्यासिका हॉल येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन अमोल बागुल, मुख्याधिकारी, एरंडोल नगरपालिका यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार करण्यात आले.

कार्यक्रमासाठी माहिती अधिकार फेडरेशन, नवी मुंबईचे अध्यक्ष सुभाष बसवेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार नागरिकांचे अधिकार व शासकीय कार्यालयांची भूमिका या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व, नागरिकांना प्राप्त असलेले अधिकार तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी
याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच व्यासपीठावर कर निरीक्षक जनार्दन येवले, ॲड. मौहन शुक्ला आणि ॲड. पंकज पाटील हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुसुम पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक जनार्दन येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कपिल भावसार यांनी उपस्थित मान्यवर, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. या कार्यक्रमास शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते , पत्रकार तसेच एरंडोल नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहितीचा अधिकार हा नागरिकांना सक्षम करणारा तसेच प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी, लोकाभिमुख आणि नागरिककेंद्री करण्याच्या दृष्टीने एरंडोल नगरपालिकेमार्फत विविध जनजागृतीपर व मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.





