रक्षाबंधनानिमित्त गोपी गोल्डच्या विद्यार्थिनींचा पोलीस व बस डेपो कर्मचाऱ्यांशी स्नेहबंध.
एरंडोल – येथील गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोलच्या आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार,अनिल पाटील,विजय पाटील,ठाणे अंमलदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी पोलिस विभागाच्या वतीनेही विद्यार्थिनींना आपुलकीने शुभेच्छा देत “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील नागरिकांचे, विशेषतः मुलींचे व महिलांचे सदैव संरक्षण करण्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना पोलिसांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. FIR म्हणजे काय, ती कशी दाखल केली जाते, 112 क्रमांकावर संपर्क केल्यानंतर पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते, निर्भया पथकाची भूमिका, सायबर सुरक्षितता, कारागृह व्यवस्था तसेच मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारले असून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले.
पोलीस स्टेशननंतर विद्यार्थिनींनी एरंडोल बस डेपोला भेट देत तेथील डेपो व्यवस्थापक व परिवहन विभागातील डेपो मॅनेजर दिलीप महाजन,सतीश महाजन,हर्षा मोरे आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांना राखी बांधली. चालक, वाहक तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून विद्यार्थिनींनी त्यांच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस स्टेशन तर्फे तसेच बस डेपो मार्फत सर्व विद्यार्थिनींना चॉकलेट देण्यात आले.
या उपक्रमातून “रक्षण करणाऱ्या प्रत्येक हाताला सन्मानाची राखी” हा सुंदर संदेश देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मनीषा भालेराव,रोहित सपकाळे, रत्ना पटवारी आदी उपस्थित होते.





