हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांची मागणी.

प्रतिनिधी : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे खटाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब गोविंद थोरवे यांच्यावर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री गिरीजाशंकरवाडी (ता. खटाव, जि. सातारा) येथे सरपंच, ग्रामसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात थोरवे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
थोरवे यांनी आपल्या गावातील पंतप्रधान आवास योजना (२०१८) संदर्भातील लाभार्थी यादीतील गैरव्यवहार, बनावट ठराव आणि बोगस नोंदींचा भंडाफोड माहिती अधिकाराखाली केला होता. याच सूडातून सरपंच व त्यांच्या नातेवाइकांनी मध्यरात्री घातपात केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात सी.आर. क्रमांक १५५/२०२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र आरोपी –
१) कुमार बापुराव थोरवे (आर्मी सेवेत),
२) बाळकृष्ण उत्तम थोरवे (पोलीस कर्मचारी, पाटण),
३) सुनील बापुराव थोरवे (सध्याचे सरपंच),
४) अनिल बापुराव थोरवे,
५) आशिष अनिल थोरवे –
यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर (पनवेल, मुंबई) यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत म्हटले की, “माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले हा लोकशाहीवरील गंभीर आघात आहे. आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास झाला पाहिजे. प्रशासनाने निष्क्रिय भूमिका घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.”
फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना ई-मेलद्वारे प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




