बहिणाबाईंच्या कवितेत जीवनदृष्टीची गोडी – कवी प्रवीण महाजन

प्रतिनिधी एरंडोल – खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेत जीवन जगण्याची अचूक दृष्टी असून त्या कवितांमधील भावार्थ तत्त्वज्ञानाची शिकवण देतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण महाजन यांनी केले. बहिणाबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तकांच्या बगीच्यात राष्ट्रीय साहित्य संघातर्फे आयोजित केलेल्या बहिणाबाई काव्य महोत्सवा प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक लताताई सुतार तर प्रमुख अतिथी म्हणून विखरणचे मुकुंदा ठाकूर, कीर्ती महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
या काव्य महोत्सवात विविध कवींनी बहिणाबाईंच्या साहित्यातील आशयाशी नाते सांगणाऱ्या कविता सादर केल्या. कवयित्री मनीषा रघुवंशी यांनी लेकरसनी माय या कवितेतून आईच्या माया–प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थिनी पूनम ठाकूर हिने आपल्या अहिराणी भाषेतील माय या कवितेद्वारे आईचे जीवनातील स्थान आणि आठवणींचा भावस्पर्शी उलगडा केला.
ज्येष्ठ कवयित्री लताताई सुतार यांनी घर या कवितेतून घराच्या भावविश्वातील मायाळूपणा रेखाटला. डी.डी.एस.पी. कॉलेजचे प्रा. मयूर वाडी यांनी उघड्यावरचा संसार या कवितेतून एका स्त्रीच्या संघर्षमय जीवनाची व्यथा प्रभावीपणे मांडली.
कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण आधार महाजन यांनी माझी बहीणाबाई या कवितेतून बहिणाबाईंच्या काव्यपरंपरेचा परामर्श घेत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सांगता रमेश दोडे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.




