एरंडोल तालुक्यात भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन; नागरिकांची कामे ठप्प

एरंडोल : राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एरंडोल तालुक्यातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलनात सहभाग घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. जमीन मोजणी, फेरफार नोंदी, ७/१२ उतारे, नकाशे व इतर अभिलेख संबंधित कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून प्रकरणे प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे.
“एकतायाः सामर्थ्य दर्शयामः, स्वस्य अधिकारस्य रक्षणं कुर्मः” या घोषवाक्याखाली भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून २० फेब्रुवारीपर्यंत काळ्या फिती लावून केवळ अत्यावश्यक कार्यालयीन कामकाज केले.
दुसऱ्या टप्प्यात २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा टाकून असहकार आंदोलन छेडण्यात आले आहे. या कालावधीत नियमित कामकाजावर परिणाम झाल्याने जमीन व्यवहार, बँक कर्जप्रकरणे, वारस नोंद, तसेच शेतीसंबंधित कामे रखडली आहेत. शेतकरी व नागरिकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत असून शासनाने लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
तिसऱ्या टप्प्यात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य कार्यालयावर आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास २ मार्च २०२६ पासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल समितीने दिलगिरी व्यक्त करत सहकार्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा एरंडोल तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




