यशदा’चे ग्राहक संरक्षण विषयक प्रशिक्षण प्रमाणपत्र अब्राहम आढाव यांना प्रदान..

प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते तथा ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे चे संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी ग्राहक संरक्षण विषयक तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानिमित्त त्यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
केंद्रीय मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (DOPT) मार्गदर्शनाखाली ‘यशदा’ या शासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर विशेष निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणामध्ये ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील महत्त्वाच्या तरतुदी, तक्रार निवारण प्रक्रियेचे टप्पे, ग्राहक आयोगाची कार्यपद्धती तसेच ग्राहक जनजागृती यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात अब्राहम आढाव यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रशिक्षण पूर्ण केले.
याबाबत प्रतिक्रिया देताना अब्राहम आढाव म्हणाले की, “सामान्य नागरिकांना त्यांच्या ग्राहक हक्कांविषयी जागरूक करणे आणि अन्याय झाल्यास त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा पुढील काळात माझा मुख्य प्रयत्न राहील. नागरिकांची जागरूकता हीच खरी ग्राहक संरक्षणाची ताकद आहे.”
या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.



