एरंडोल तालूक्याला अवकाळी पावसाचा तडाखा
उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा-शेतकर्यांची चिंता वाढली..

प्रतिनिधी एरंडोल – शहरासह संपूर्ण जळगांव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देत हवामान विभागाने येत्या दोन दिवसापर्यंत‘ऑरेंज अलर्ट’ लागू केला आहे. दि. 30 रोजी दुपारी 4 वाजेनंतर अचानक हवामानात बदल होवून ढग दाटून आले आणि 5 वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्याने नागरीकांना उकाड्यापासून तर दिलासा मिळाला परंतू शेतकर्यांचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचे पहावसाय मिळाले. अवकाळीचा पुन्हा तडाखा बसल्याने सध्या उन्हाळा आहे की पावसाळा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हवामान विभागाने मार्चदरम्यान वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्याची परिस्थिती पाहता हा अंदाज अचूक ठरत असल्याचे दिसत आहे. काल दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले आणि शहरासह तालूक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या बदलासोबतच जोरदार वारेही वाहू लागले, त्यामुळे तापमानात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतातील गहू, मका, हरभरा, रब्बी ज्वारी काढणीच्या राहिलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची हानी झाल्याने चिंतेत सापडला आहे. तर शेतकर्यांनी आपला माल आणि गुरा-ढोरांसाठी शेतात उभारलेल्या शेडचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल वादळी वार्यासह अवकाळी सरी पडल्या जवळपास 30 ते 40 मिनिटे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सदर वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे कोणतीही वित्त अथवा जिवीत हानी झाली नसल्याचे समजते.




