राज्यात कृषी सेवा केंद्र चालकांचा इशारा; २७ एप्रिलपासून बेमुदत विक्री केंद्र बंद आंदोलन..

प्रतिनिधी एरंडोल:-राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत विक्री केंद्र बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. विक्रेत्यांच्या संघटनांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधूनही ठोस निर्णय न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे एरंडोल शहराचा तालुक्यातील कृषी केंद्र चालक संघटनेने येथे सांगितले. यावेळी गजानन महाजन, भूषण पाटील, प्रवीण पाटील, यांच्यासह अनेक कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.
विक्रेत्यांच्या मते, बियाणे, खते व कीटकनाशकांच्या पुरवठ्यातील अडथळे, कंपन्यांकडून होणारी लिंकिंग पद्धत, एचटीबीटी कापूस बियाण्यांवरील निर्बंध, तसेच सिलबंद पॅकिंगमुळे तपासणीदरम्यान विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबतच्या निर्णयात बदल, खतांच्या विक्रीतील एफओआर पद्धतीचा दबाव, तसेच नमुना तपासणीतील विलंब यांसारख्या मुद्द्यांवरही विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाने वेळोवेळी आदेश व सुधारणा जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. परिणामी, राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील कृषी सेवा केंद्र चालकांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय गंभीर ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
विक्रेत्यांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली असून, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.





