जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांसाठी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध..

प्रतिनिधी एरंडोल – उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी एरंडोल नगरपरिषद तर्फे ‘उष्माघात जनजागृती अभियान’ राबविण्यात येत आहे. “उष्माघात टाळा… आरोग्य जपा… सुरक्षित रहा…” या संदेशातून नागरिकांमध्ये जनजागृती करून उन्हाळ्यात आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत शहरातील प्रमुख भागांमध्ये नागरिकांसाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बस स्थानक, धरणगाव चौफुली, मरिमाता चौक आणि म्हसावद नाका या ठिकाणी थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः प्रवासी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यासोबतच नगरपरिषदेचे कर्मचारी शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन पॅम्पलेटचे वाटप करत उष्माघाताबाबत जनजागृती करत आहेत. उष्माघाताची लक्षणे, त्यापासून बचाव करण्याचे उपाय, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नगरपरिषदेकडून जनजागृतीसोबतच पाणपोईसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
अभियानांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये उष्माघाताविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, हलका व पौष्टिक आहार घेणे, तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळे हे अभियान अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत एरंडोल नगरपरिषद तर्फे शहरवासीयांना सजग राहून उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button