दमदार पावसानंतर एरंडोल तालुक्यात पेरण्या अंतिम टप्प्यात; कापूस व मक्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, आता नजरा वरुणराजाकडे

प्रतिनिधी एरंडोल : यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली, तरी झालेल्या पहिल्या दमदार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली. त्यामुळे तालुक्यात सध्या समाधानाचे वातावरण असले, तरी पुढील पावसाच्या प्रतीक्षेने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
तालुक्यात आतापर्यंत ३२ हजार १६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये कापूस २० हजार ८०१ हेक्टर, मका ६ हजार ९७४ हेक्टर, सोयाबीन २ हजार ३४७ हेक्टर आणि मूग १ हजार ८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय उडीद, तूर, ज्वारी व बाजरी या पिकांचीही कमी-अधिक प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस व मका या नगदी पिकांकडे विशेष कल दिसून येत आहे. कापसाखाली सुमारे ५० टक्के, तर मक्याखाली ३० ते ३५ टक्के क्षेत्र आले आहे. बाजारातील मागणी, उत्पादनाची क्षमता आणि आर्थिक परतावा लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी या पिकांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
सध्या तालुक्यातील ९० ते ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता पिकांच्या उगवणीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. या अवस्थेत पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर उगवण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी दुबार पेरणीचे संकट ओढवू नये, अशी प्रार्थना करत आहेत.
पहिल्या पावसाने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला असला, तरी पावसाने पुन्हा पाठ फिरविल्याने चिंता वाढू लागली आहे. शेतातील बीज अंकुरण्याच्या अवस्थेत असल्याने वेळेत पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे, खते व मशागतीवरील गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सध्या एरंडोल तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, वरुणराजाने लवकरच पुनरागमन करून पिकांना जीवनदान द्यावे, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाचे सातत्य कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरण्याची आशा बळीराजाला आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत सल्ला घेऊन पुढील उपाय योजना कराव्यात.
जेथे पिकाची उगवण दिसून येईल तेथे कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
एरंडोल कृषी अधिकारी
डी पी गंभीरे




