जळगावमहाराष्ट्र

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला एरंडोलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; लहान बालकांना पोलिओचे डोस


एरंडोल : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत एरंडोल शहरात रविवारी मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय, एरंडोल यांच्या वतीने शहरातील बसस्थानक परिसर, गणपती मंदिर, बुधवार दरवाजा, प्राथमिक शाळांसह विविध ठिकाणी पल्स पोलिओ केंद्रांची उभारणी करण्यात आली होती.

या मोहिमेचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते एका लहान बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.

शहरातील विविध भागांमध्ये केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याने पालकांना आपल्या लहान मुलांना पोलिओचे डोस देणे सोयीचे झाले. त्यामुळे नागरिकांनीही मोठ्या संख्येने पल्स पोलिओ केंद्रांना भेट देत आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले.

“दोन थेंब जीवनाचे” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे आणि समाज पोलिओमुक्त राहावा, यासाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button