एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कृष्णा ओतारी यांची बिनविरोध निवड; सभागृहात जल्लोष

प्रतिनिधी एरंडोल:- नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कृष्णा प्रल्हाद ओतारी यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या निवडणूक प्रक्रियेसाठी एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिठासीन अधिकारी यांनी कृष्णा प्रल्हाद ओतारी यांच्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करून तो वैध ठरवला. उपाध्यक्षपदासाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. विशेष सभेला नगरपरिषदेच्या एकूण २५ सदस्यांपैकी २१ नगरसेवक उपस्थित होते.
निवडीनंतर नवनियुक्त उपाध्यक्ष कृष्णा ओतारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी, सभा लिपिक लक्ष्मण पाटील आणि महेंद्र पाटील यांनी आवश्यक प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.




