जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटील महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांची गगनभरारी; संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश


एरंडोल प्रतिनिधी : – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संरक्षण क्षेत्रातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
संरक्षण क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ओम महाजन, वैभव महाजन, किरण पाटील, कमलेश मोरे, समीर मिर्झा, ऋषिकेश पाटील, हर्षल पाटील, तेजस धनगर आणि द्रोण सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अमितजी राजेंद्रजी पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक करत त्यांनी देशसेवा ही सर्वोच्च सेवा असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे अभिनंदन करताना सांगितले की, एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित करते. या विद्यार्थ्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि संरक्षण क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी यश प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत, शिस्त, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची गौरवशाली परंपरा अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले.
या गौरवपूर्ण सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी अधिकारी तसेच मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात गौरव केला. महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button