संस्थाध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रम

रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीसह वृक्षारोपण; ९० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
प्रतिनिधी एरंडोल :- यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थाध्यक्ष दादासाहेब अमित राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रम उत्साहात घेण्यात आले.
हर्षदा क्लिनिकल लॅब, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व युवती सभा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात सुमारे ९० विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य तपासणीही करण्यात आली.
दरम्यान, विज्ञान मंडळातर्फे महाविद्यालय परिसरात संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. तसेच भाषा विभागातर्फे साहित्य विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, हर्षदा क्लिनिकल लॅबचे संचालक विरेंद्र भिमसिंग पाटील, स्वप्निल पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नरेंद्र गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन प्रा. योगेश येंडाईत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मीना काळे यांनी केले, तर आभार डॉ. शर्मिला गाडगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS व NCC स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.





