जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलांच्या झुलींवर सामाजिक प्रश्नांना वाचा…, एरंडोलच्या प्रल्हाद महाजन यांचा पोळ्यानिमित्त अनोखा जनजागृती उपक्रम


प्रतिनिधी एरंडोल : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या झुलींवर विविध सामाजिक प्रश्न मांडत एरंडोल येथील शेतकरी प्रल्हाद पितांबर महाजन यांनी यंदाही समाजप्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबविला. विखरण रस्त्यालगत राहणाऱ्या महाजन यांच्या या उपक्रमाचे शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.
बैलपोळ्याच्या दिवशी सजविण्यात आलेल्या बैलांच्या झुलींवर ‘नीट’, टीईटी पेपरफुटी, मुलांना मोबाईल देण्यापूर्वी पालकांचे आत्मपरीक्षण, कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाऐवजी जिल्हा परिषद शाळांवर खर्च झाला असता तर त्या बंद पडल्या नसत्या, तसेच बंद असलेला वसंत साखर कारखाना सुरू करण्याची मागणी अशा विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
प्रल्हाद महाजन मागील सुमारे दहा वर्षांपासून बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या अंगावरील झुलींवर सामाजिक संदेश लिहून जनजागृती करीत आहेत. पारंपरिक सणाला सामाजिक भानाची जोड देत त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, महाजन यांनी यंदा विविध प्रश्नांवर भाष्य केले असले तरी एरंडोल तालुक्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे बैलपोळ्यासारख्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सणाच्या निमित्ताने पावसाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची व्यथा या झुलींवर उमटली असती तर जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप आले असते, अशी प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button