जळगावमहाराष्ट्र

कासोद्यात युरीया टंचाईचा मोठा पर्दाफाश! ६ दुकानांत ३४१८ गोण्यांचा साठा जप्त; शेतकऱ्यांची लूट उघड

कासोदा ता. एरंडोल – येथील युरीया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने केलेल्या धाडीत मोठा साठा उघडकीस आल्याने खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना “युरीया उपलब्ध नाही” असे सांगितले जात असताना, तब्बल ६ दुकानांत ३४१८ गोण्यांचा साठा आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तक्रारीनंतर प्रशासन एक्शन मोडवर

लहुराज विश्राम मराठे, जितेंद्र परशुराम तांदळे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी युरीया मिळत नसल्याची तक्रार जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. त्यानुसार दि. १८ रोजी सकाळी १० वाजता कृषी विभागाचे पथक कासोद्यात दाखल झाले.

या पथकात जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे आणि तालुका गुणवत्ता नियंत्रक निखिल टोळकर यांचा समावेश होता.

गोडाऊनमध्ये ‘बंपर स्टॉक’, शेतकऱ्यांना मात्र टंचाई!

गावातील सर्व खत विक्रेत्यांच्या गोडाऊनची तपासणी करण्यात आली. त्यात युरीयाचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. मात्र शेतकऱ्यांना “खत संपले आहे” असे सांगून परत पाठवले जात होते.

अव्वाच्या सव्वा दराने विक्री

नको असलेली खते घेण्याची सक्ती

काही ठिकाणी २०१८ सालची मुदत संपलेली खते व बियाणे

बोगस खतांच्या गोण्यांची चर्चा

कारवाई सुरू असलेल्या कंपन्यांची खते गोडाऊनमध्ये सापडल्याचा संशय

या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तपासणी झालेली दुकाने

प्रविण हार्डवेअर व कृषी केंद्र, आबासाहेब खंडेराव फ्रुटसेल सोसायटी, साई कृषी केंद्र, सुर्यवंशी कृषी केंद्र, सुदर्शन कृषी केंद्र, गणेश पुंडलीक वाणी कृषी केंद्र, जाजू अॅग्रो केंद्र आदी दुकानांची दिवसभर झडती घेण्यात आली.

गंभीर अनियमितता उघड

अनेक दुकानांकडे विक्रीची योग्य नोंद उपलब्ध नव्हती

शेतकऱ्यांच्या नावावर अवास्तव बिले

रेकॉर्डमध्ये तफावत

६ दुकानांत एकूण ३४१८ गोण्या अवैध साठा

यामुळे संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

४ दिवसांत खुलासा, त्यानंतर कारवाई

“आज तपासणी करण्यात आली असून संबंधितांकडून ४ दिवसांत खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना

जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की –

खत खरेदी करताना आधारकार्ड सोबत ठेवावे

आधार लिंक करूनच खरेदी करावी

दुकानातील विक्रीची नोंद तपासावी

पक्क्या बिलाशिवाय खते खरेदी करू नयेत

कोणतीही तक्रार असल्यास न घाबरता कृषी विभागाशी संपर्क साधावा

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल

शेतकऱ्यांत उत्सुकता

या धाडीनंतर आणखी काय तथ्य बाहेर येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. टंचाईच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button