१ मे श्रमिक दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् तर्फे श्रमिकांचा सन्मान

एरंडोल | प्रतिनिधी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्राच्या वतीने तसेच राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू व विश्वकर्मा निर्माण प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय श्रमिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ब्रह्माकुमारीज् आत्मनुभूती भवन ओम शांती केंद्र, ओम शांती नगर एरंडोल येथे दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी 8.00 वाजता आयोजित करण्यात आला असून,
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगाव चे प्रसिद्ध आर्किटेक श्री धीरज सोनी उपस्थित राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिकांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या योगदानाचे महत्त्व तसेच समाजनिर्मितीत त्यांच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील श्रमिकांचा सन्मान होय. बांधकाम, उद्योग, शेती, सेवा क्षेत्र आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या श्रमिकांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच समाजातील विविध घटकांमध्ये श्रमिकांविषयी आदर व कृतज्ञता निर्माण करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात शासकीय व प्रशासकीय अधिकारी, नगरपरिषद व नगरपालिका अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी, यांच्यासह विविध उद्योगांतील कामगार, कर्मचारी, कामगार क्षेत्रातील श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
नव्वदोशकोत्सव विशेष:
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या स्थापनेच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त ‘नव्वदोशकोत्सव’ अंतर्गत साजरा केला जाणार असल्याचे समन्वयक डॉ सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून श्रमिकांचा सन्मान व समाजजागृती हा मुख्य उद्देश असल्याने सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एरंडोल ओम शांती केंद्राच्या संचालिका पुष्पा दीदी यांनी केले आहे.





