जळगावमहाराष्ट्र

एरंडोल शहरात दुग्धजन्य जनावरांची संख्या आणि दुधाचा पुरवठा; भेसळीच्या शंकेकडे प्रशासन लक्ष देणार का?


प्रतिनिधी एरंडोल  – शहरातील पशुधन गणनेची आकडेवारी आणि शहरात दररोज होणारा दुधाचा मोठ्या प्रमाणातील पुरवठा यामध्ये तफावत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू असून, यामुळे दुधाच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य भेसळीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयाकडे संबंधित विभागांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एरंडोल तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरात सध्या २,६२६ गायी आणि २,३७६ म्हशी अशी एकूण ५,००२ दुग्धजन्य जनावरे आहेत. याशिवाय १,५४६ शेळी-मेंढ्या आणि ७,९०१ कोंबड्या असून शहरातील एकूण पशुधन संख्या १४,४४९ इतकी आहे.
मात्र, या जनावरांच्या संख्येच्या तुलनेत शहरात दररोज विकल्या जाणाऱ्या दुधाचे प्रमाण अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पशुपालकांच्या माहितीनुसार सर्वच गायी-म्हशी दुभत्या नसतात. अनेक जनावरे भाकड अवस्थेत असतात, काही लहान वयाची असतात तर काहींची दूध उत्पादन क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे प्रत्यक्ष दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांची संख्या एकूण आकडेवारीपेक्षा कमी असते.
यामुळे शहरात उपलब्ध होणाऱ्या दुधाचा मोठा पुरवठा नेमका कोणत्या स्रोतांमधून होत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी दुधामध्ये पाणी, स्टार्च, कृत्रिम घटक किंवा अन्य पदार्थांची भेसळ होत नसल्याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणीची मागणी केली आहे.
दूध हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि शुद्धता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. भेसळयुक्त दूध आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग, दुग्ध विकास विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
शहरातील दूध संकलन केंद्रे, खासगी डेऱ्या आणि फिरते दूध विक्रेते यांच्याकडून विकल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने वेळोवेळी तपासण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शहरातील प्रत्यक्ष दूध उत्पादन क्षमता, बाहेरून येणारा दूध पुरवठा आणि स्थानिक विक्री यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास वास्तव परिस्थिती स्पष्ट होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा संवेदनशील विषय असल्याने संबंधित विभागांनी वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून शहरातील दुधाच्या उत्पादन व पुरवठ्याचे वास्तव चित्र जनतेसमोर मांडावे, तसेच भेसळमुक्त दूध उपलब्धतेसाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
चौकट : एरंडोल शहरातील पशुधन आकडेवारी
गायी : २,६२६
म्हशी : २,३७६
एकूण दुग्धजन्य जनावरे : ५,००२
शेळी-मेंढ्या : १,५४६
कोंबड्या : ७,९०१
एकूण पशुधन : १४,४४९
प्रश्न कायम : “एरंडोल शहरातील उपलब्ध दुग्धजन्य जनावरांच्या तुलनेत होणारा दुधाचा पुरवठा नेमका किती? आणि त्यामधील दूध पूर्णपणे भेसळमुक्त आहे का?” — या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button