जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

कुस्तीतील दुखापतींचा सखोल अभ्यास पूर्ण; प्रा. किशोर वाघ यांचा पीएचडीने गौरव

प्रतिनिधी, एरंडोल — येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. किशोर जयाजी वाघ यांना “आंतर विद्यापीठीय कुस्तीपटूंमध्ये आढळणाऱ्या दुखापतींचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण एरंडोल परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीएचडी पदवी प्रदान सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. वाघ यांनी कुस्तीपटूंमध्ये आढळणाऱ्या विविध दुखापतींचा सखोल व चिकित्सक अभ्यास केला.
कुस्ती हा अत्यंत कष्टप्रद आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक खेळ मानला जातो. या खेळात खेळाडूंना वारंवार दुखापतींना सामोरे जावे लागते. प्रा. वाघ यांच्या संशोधनामुळे अशा दुखापतींचे प्रकार, कारणे आणि परिणाम यांचा सविस्तर उलगडा झाला आहे. तसेच या दुखापती टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या शास्त्रोक्त उपाययोजना, प्रशिक्षण पद्धती व काळजी याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे कुस्तीपटूंचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासो अमित पाटील यांनी प्रा. वाघ यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “क्रीडा क्षेत्रातील संशोधनातून प्रत्यक्ष खेळाडूंना लाभ मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रा. वाघ यांचे संशोधन कुस्तीपटूंसाठी दिशादर्शक ठरेल.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत, हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच एरंडोल परिसरातील क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रा. वाघ यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रा. किशोर वाघ यांनी क्रीडा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मिळवलेले हे सर्वोच्च शैक्षणिक यश केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण संस्थेसाठी गौरवास्पद ठरत आहे. त्यांच्या संशोधनामुळे कुस्ती क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट होऊन भविष्यातील खेळाडूंना नवी दिशा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button