सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध सोहळा; अश्विन-माधुरीचा आदर्श उपक्रम चर्चेचा विषय

सामाजिक समता, साधेपणा आणि प्रबोधनाचा संदेश; मान्यवरांसह नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
एरंडोल प्रतिनिधी : समाजात वाढत्या दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि अनावश्यक परंपरांच्या पार्श्वभूमीवर शिरसोली शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने पार पडलेला अश्विन व माधुरी यांचा साक्षगंध सोहळा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. साधेपणा, सामाजिक समता आणि विवेकवादी विचारांचा संदेश देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
एरंडोल येथील माजी नगरसेवक रुपेश रामा माळी व उपनगराध्यक्ष सौ. सुनीता रुपेश माळी यांचे पुतणे तसेच रितेश रामा माळी व सौ. पुष्पा रितेश माळी यांचे चिरंजीव चि. अश्विन यांचा साक्षगंध शिरसोली येथील आनंदा धनराज चौधरी यांची सुकन्या माधुरी हिच्यासोबत रविवार दि. १० मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विशेष म्हणजे हा सोहळा सत्यशोधक पद्धतीने पार पडला. कोणत्याही प्रकारचा दिखाऊ खर्च, पारंपरिक आडंबर किंवा अनावश्यक धार्मिक विधींना फाटा देत समानता, विचारशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम अनेकांसाठी आदर्श ठरला. सत्यशोधक चळवळीचे विचार पुढे नेत समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या साक्षगंध सोहळ्याचे विधी साडूबा पांडव यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी उपस्थितांना सत्यशोधक पद्धतीचे महत्त्व सांगत समाजाने अंधश्रद्धा व अवाजवी खर्च टाळून अशा विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला एरंडोल शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वडीलधारे ज्येष्ठ नागरिक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत माळी व चौधरी परिवाराच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले.
सोहळ्यात उपस्थित नागरिकांनीही अशा पद्धतीचे कार्यक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. वाढत्या खर्चिक विवाहसोहळ्यांच्या काळात सत्यशोधक पद्धतीने होणारे विवाह व साक्षगंध हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
शिरसोली शहरात प्रथमच झालेल्या या सत्यशोधक साक्षगंध सोहळ्यामुळे परिसरात सकारात्मक चर्चा रंगली असून, समाजात प्रबोधनाचा नवा संदेश देणारा हा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.




