नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच केली गटार सफाई!

एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल शहरातील माळीवाडा परिसरात नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना स्वतःच गटार साफ करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील रहिवासी प्रल्हाद महाजन यांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने अखेर स्वतः गटार सफाईचा पुढाकार घेतला.
महाजन यांनी दि. २ जुलै २०२५ रोजी नगरपरिषदेकडे आपल्या घरासमोरच्या पोटगटार ब्लॉकेजविषयी लेखी तक्रार दिली होती. गटार ब्लॉक झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते, दुर्गंधी पसरली होती आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. मात्र, दोन महिन्यांनंतरही नगरपरिषदेने कोणतीही दखल घेतली नाही.
महाजन यांनी सांगितले, “दोन महिन्यांपासून अर्ज देऊन थकलो, तरी अधिकारी आणि कर्मचारी कुणीच आले नाहीत. कर्मचारी संपावर गेले आहेत की काय, अशी वेळ आली आहे,” असे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग न झाल्याने दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी महाजन यांनी स्वतः व आपल्या मुलांच्या मदतीने गटार साफसफाई केली. त्यांच्या या कृतीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले असून अनेकांनी नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “नाल्यांची नियमित सफाई होत नाही. पावसाळ्यात सांडपाण्याचा त्रास अधिक वाढतो. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.




