क्राईमजळगावमहाराष्ट्र

जळगावात २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; अकोल्यातून दुकानदार व भाच्याची सुटका

प्रतिनिधी – जळगाव शहरातील मोबाईल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदार व त्यांच्या भाच्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अकोला येथून दोघांची सुखरूप सुटका केली असून दोन प्रौढ आरोपी व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. चंदनवाडी, शनिपेठ, जळगाव) याने फिर्यादी कृष्णकुमार डुंगाराम चौधरी (वय ३२) यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (वय १९) यास जळगावातील ममुराबाद रोडवरील दक्षिणमुखी वीर हनुमान मंदिराजवळील गल्लीत एका घरात बांधून ठेवले. त्यानंतर फिर्यादी चौधरी यांना मोटारसायकलवरून अकोला येथे पळवून नेण्यात आले.
अकोला येथे आरोपीने आपल्या साथीदार युवराज गणेश पवार (वय २४, रा. ताथोड नगर, अकोला) याच्या मदतीने फिर्यादीस एका घरात डांबून ठेवले. तेथे फिर्यादीकडून खंडणी म्हणून गुगल पे द्वारे १५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपींच्या १५ वर्षीय अल्पवयीन साथीदाराने भाचा गणपतलाल यास अकोला येथे आणल्यानंतर दोघांनाही ताथोड नगरमधील एका घरात कैद करून ठेवण्यात आले.
आरोपींनी फिर्यादींच्या भाच्याला जीवे मारण्याची धमकी देत २० लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले आणि फिर्यादींना जळगाव येथे पाठवून दिले. त्यानंतर फिर्यादींनी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून सीसीटीएनएस क्र. २३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३७(२), १४०(२), १४२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तातडीची कारवाई; अकोला एलसीबीची मदत
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ तपास सुरू केला. अपहरण करण्यात आलेल्या भाच्याच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला.
अकोला एलसीबीच्या पथकाने तातडीने कारवाई करून दोन्ही अपहृतांची सुटका केली व आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर जळगाव एलसीबी व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अकोला येथे जाऊन आरोपी व पीडितांना ताब्यात घेत जळगाव येथे आणले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
जळगाव व अकोला पोलिसांच्या समन्वयातून अवघ्या काही तासांत अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून शहरात या कारवाईचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button