ज्ञानाचा अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांसाठी खुला; डॉ. भुसनळे यांचा स्तुत्य उपक्रम..

एरंडोल, प्रतिनिधी : शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी परत देण्याच्या उदात्त भावनेतून एरंडोल शहरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. राजेंद्र भुसनळे यांनी आपल्या नातवाने JEE (Joint Entrance Examination) परीक्षेच्या तयारीसाठी वापरलेली अत्यंत उपयुक्त व महागडी अशी सुमारे २०० ते ३०० पुस्तके एरंडोल नगरपरिषद संचालित कर्मवीर अभ्यासिकेला दान करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
स्पर्धेच्या युगात अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना महागडी संदर्भ पुस्तके खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. भुसनळे यांनी केलेले हे पुस्तकदान ज्ञानाचा अमूल्य ठेवा ठरणार आहे.
कर्मवीर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा थेट लाभ मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा व बळ मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरसेवक प्रा. मनोज पाटील, नगरसेवक सैय्यदअली जाफरअली तसेच नगरसेवक नितेश चौधरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. भुसनळे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
एरंडोल नगरपरिषदेतर्फे डॉ. राजेंद्र भुसनळे यांचे या बहुमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले तसेच त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
“पुस्तकांचे दान म्हणजे भविष्यातील पिढीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा देणे,” या उक्तीची प्रचिती डॉ. भुसनळे यांच्या या उपक्रमातून आल्याची भावना विद्यार्थी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





